॥ श्री ॥
देहात्म योग याचा अर्थ देह अधिक आत्मा या दोघांचा संयोग असलेली स्थिती.जोपर्यंत देहात चैतन्यरूपी आत्मतत्वाचे जे प्रागट्य होत आहे तोपर्यंत देहामध्ये संवेदना आहे.तो अंतरात्माच देहामध्ये राहून अनंत कर्म करून घेतो.पण ज्याक्षणी देहाचा प्राणरूपाने त्याग केला त्याक्षणी गलितगात्र होऊन पडतो.अशा देहामध्ये अंतरात्म्याला जाणण्यासाठी जाणीव, संवेदनशीलता,निर्माण होणे आवश्यक आहे. तसेच भगवंताच्या प्राप्तीसाठी वाणीला आत्मानुभूतीची जोड हवी.अशा दोन मनाच्या सूक्ष्म अवस्थांच्या आधारे आपल्याला आत्मारामाचे दर्शन प्राप्त करून घेता येवू शकते.आणि ही अंतःकरणाची प्राप्त करण्याचे साधन म्हणजे भगवंताचे नाम.म्हणून समर्थ आत्मारामाच्या दर्शनासाठी,या दोन तत्वांच्या प्राप्तीसाठी भगवंताच्या नामाचे महत्त्व सांगताना म्हणतात.....
*सकळ जनामधें नाम ! रामनाम उत्तमोत्तम !
श्रम जाउनी विश्राम ! चंद्रमौळी पावला !!
या सृष्टीमध्ये जर आज भगवंताच्या प्राप्तीसाठी लागणारी संवेदनाशीलता ही आत्मानूभूती कशाने प्राप्त होत असेल तर त्याचे साधे सोपे साधन भगवंताच्या नामाचे आहे.आणि त्या नामामध्ये देखील ज्याचे मन रामनामावर अनुरूक्त झालं,ज्याला गुरूकृपेने रामनामाचा वारसा मिळाला आहे त्याचे भाग्य फार थोर आहे.राम या दोन शब्दांतच खरंतर परमार्थाचे रहस्य सामावलेले आहे.या रामनामाने प्रत्यक्ष महादेवाला देखील विश्राम प्राप्त झाला.
रामनामाची मोहर आपल्या प्रत्येक श्वासावर उमटवण्यासाठी कुठल्याही उपाधीची गरज नाही.हातात माळ असो किंवा नसो या रामनामाचे स्मरण तुम्हांला कलीयुगात या धकाधकीच्या जिवनात देखील समाधानरूपी विश्राम मिळवून देईल.या रामनामाच्या आधाराने एक अपरिमित अशी विलक्षण शक्ती आपल्या जिवनात प्रवेश करते आणि ती सर्व कर्मांमध्ये आपल्या जिवनामध्ये ही चाललेली एकप्रकारची ओढाताण अगदी नकळतपणे शांत करते.कर्माचा त्याग करू देत नाही परंतु त्या कर्मामध्ये आसक्त असलेले आपले मन या रामनामाच्या आधाराने ती विश्राम करून देते. त्यामुळं जो आराम महादेवाला सत्ययुगामध्ये प्राप्त झाला तसाच विश्राम कलीयुगात,या २१ व्या शतकात,धकाधकीच्या जिवनात रामनामाच्या दोन सुंदर अशा अक्षरांमधून जिवाला प्राप्त करून घेता येवू शकतो.
एकदा का मनुष्य विश्राम या स्थितीमध्ये आला की मगच तो आपल्या अंतर्मुख स्थितीचा अभ्यास करू शकतो.कारण जोपर्यंत तो विश्रामामध्ये नाही तोपर्यंत त्याचे मन बहिर्मुख राहणार आणि ते मन आत्मारामाकडे वळू शकत नाही.त्यामुळं समर्थ म्हणतात की.....
*नामाचा महिमा थोर ! रूप कैसें उत्तरोत्तर !
परात्पर परमेश्वर ! त्रयलोक्यधर्ता !!
*आत्माराम चहुंकडे ! लोक वावडे जिकडे तिकडे !
देहे पडे मृत्य घडे ! आत्मयाविण !!
या नामाचा विलक्षण असा महिमा आहे.हे नाम आपल्याला अंतर्मुख करते,आपल्या मनाला आतमध्ये वळवते,जे मन स्थूल गोष्टींशी आसक्त होऊन लिप्त झालेले आहे असे या स्थूलजगामध्ये अडकलेले आपले मन रामनाम सहजपणे त्या गोष्टींमधून सोडवते आणि अंतरंगाच्या सूक्ष्मतेकडे वळवते.जसजसे मन सूक्ष्म होऊ लागतं तसं ते मन एका विलक्षण उंचीपर्यन्त आपल्याला घेऊन जाऊ शकतं.
गरज आहे थेंब,थेंब आयुष्याच्या प्रत्येक क्षणावरती या नामाची मोहर उमटवण्याची.हे नामच या मनाला सगुण आणि निर्गुणाच्या सीमारेषेपर्यन्त घेऊन जाऊ शकतं ज्याचे नाव तुर्या आहे.या तूर्येच्या सीमारेषेवर एका बाजूला ही दृश्यजगाने भरून उरलेली सृष्टी तर एका बाजूला असलेले हे निर्गुण निराकारतत्व याच्यामध्ये एखाद्या उंबरठ्याप्रमाणे जिवाला त्याची जाणीव करून देऊ शकतं.मग इथं या नामाची खरी करामत आपल्या जिवनामध्ये दिसते की ज्याक्षणी हे दृश्यजग देखील एका अनाहत नादाने,त्याच्यामध्ये भरून उरलेल्या अत्यंत सूक्ष्म अशा ओंकाराने जाणवू त्याक्षणी लक्षात येतं की हे नाम आणि रूप अभिन्न आहे.
या रूपाला मी स्थूल मानत राहिलो,नामाला मी वेगळी मान्यता देत राहिलो परंतु मनाची जेव्हा अत्यंतिक सूक्ष्मता येते तेव्हा या सूक्ष्मअवस्थेत हे दृश्यजग रामरूप दिसू लागतं.आणि या दृश्यजगामध्ये अनाहताने रामनाम भरून उरलेले आहे अशी विलक्षण अनुभूती एका जिवाला प्राप्त होते.आणि मग या स्थितीत तो जे बोलतो ते शब्द कुठल्या जिवनव्यवहारातून, कुठल्या पुस्तकातून येत नाहीत ते त्याच्या आत्मानुभूतीमधून या परावाणीत ओथंबलेल्या अनुभूतीतून व्यक्त होत असतात.असे हे नाम आहे छोटं पण कार्य करतं अत्यंतिक मोठं.
अखंड रामनामाचा तुम्हां-आम्हां प्रत्येकाच्या समोर आर्जव मांडला.ते नाम आपण घ्यावं,जिवनात ती सूक्ष्मता गाठावी,त्या आत्मानुभूतीची चव चाखावी आणि या रामनामाच्या प्रकाशामध्ये त्या आत्मारामाचे दर्शन यावे हाच श्रीसमर्थांचा आर्जव.म्हणून या त्रिपदींचे अत्यंत सुंदर असे मंगलाचरण समर्थांनी या समासाच्या सुरूवातीला लिहून ठेवलं आहे.
॥ श्री॥

Comments
Post a Comment